शंकर दुपारगुडे
कोपरगाव – हौसेला मोल नाही आणि वयाला बंधन नाही. अशाच प्रकारची प्रत्यक्ष कहाणी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील एका 75 वर्षांच्या तरुणाची आहे. विश्वनाथ बाजीराव जाधव यांनी आधुक पद्धतीची घोडागाडी तयार केली असून, त्याद्वारे ते सध्या याही वयात घोडागाडीवर रपेट करून आपला छंद जोपासत आहेत.
दोन चाके असलेली गाडी, त्याला बसायला सिट, हातात धरायला हॅंडल, पाय ठेवायला फुटरेस्ट, इंजिन ऐवजी चक्क घोडा आणि क्लच, ब्रेक, ऐवजी दोरीचा कासरा, अशी आधुनिक घोडागाडी तयार करून जाधव आपल्या गावरान पेहरावात रूबाबदार मोटारसायकलवर बसल्याप्रमाणे बसुन पंचक्रोशीत फिरत असतात. त्यांच्या रुबादार घोड्याच्या टपटप आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरा 75 वर्षांच्या या तरुणाकडे आकर्षित होतात.
लाखो रुपयांच्या मोटरसायकली घेऊन फिरणाऱ्या तरुणांना 75 वर्षांचा तरुण अधिक आकर्षित वाटतो. रस्त्याने जाणारे काही तरुण या घोडागाडीच्या व त्यावर बसलेल्या 75 वर्षे वयाच्या व्यक्तीची मुद्रा आपल्या मोबाईल मध्ये घेण्यासाठी धडपड करत असतात. काही तरुणांना त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही, तर काहींनी व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकले आहेत. एखाद्या शहरामध्ये कोट्यवधी रुपये किमतीची महागडी विदेशी गाडी आणल्यानंतर जशा सर्वांच्या नजरा त्या गाडीकडे वळतात, त्याचप्रमाणे जाधव यांच्या घोडागाडीकडे सर्वांच्या नजरा वळत आहेत.
अगदी मोटरसायकलचा ब्रेक मारावा तसा ब्रेक दाबल्यावर जाधव यांच्या इशाऱ्यावर त्यांचा घोडा ही जागच्याजागी थांबतो. जाधव व त्यांचा घोडा दोघांची ऐट पाहून लोकही त्यांच्या घोडा गाडीला रस्ता मोकळा करून देतात. या घोडागाडीबद्दल जाधव म्हणतात, मी वृद्ध असलो तरी माझी फिरण्याची हौस कमी झाली नाही. घोड्यावर उडी मारुन बसण्याची माझी शारीरिक क्षमता राहीली नाही. मोटारसायकल चालवणे वयानुसार व पेट्रोल महागाईमुळे शक्य होत नाही. त्यामुळे घोडागाडी बनवून घेतली आहे.
ही घोडागाडीची विशेष कलाकृती तालुक्यातील रंवदे येथील कलाकाराकडून बनवून घेतली आहे. बाहेर फिरण्यासाठी कोणाचा आधार घेण्यापेक्षा किंवा असुरक्षित मोटारसायकलच्या फंद्यात पडण्यापेक्षा सुरक्षित घोड्याच्या जीवावर मी या घोडागाडीत फिरतोय. जान है तो शान है, असे म्हणत जाधव यांनी आपल्या घोडागाडीचा वेग वाढवत आपल्या प्रवासाचा सुरू केला.