नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटरवरुन निघालेल्या तरुणीला लोकांनी बुरखा आणि हिजाब काढायला लावल्याची घटना उघड झाली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या इस्लाम नगरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत स्कूटरवरुन जात असताना त्यांना थांबवण्यात आले. यानंतर तरुणीला आधी बुरखा आणि नंतर हिजाब काढण्याची जबरदस्ती करण्यात आली. तरुणी यावेळी रडत असतानाही लोक मात्र ऐकण्यास तयार नव्हते.
A girl was forced to remove her burkha as the people suspected that the man on whose scooter she was riding pillion was a Hindu, in Islam Nagar, Bhopal on Saturday afternoon @ndtv @ndtvindia pic.twitter.com/66QPE5OJax
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) October 16, 2021
समोर आलेल्या व्हिडीओत तरुणी रडत असून विरोध करताना दिसत आहे. मात्र यावेळी तिथे उपस्थित व्यक्ती तरुणीला तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करत आहात असे सांगत हिजाब काढण्यास सांगताना ऐकू येत आहे. तरुणीसोबत असणारा तरुणदेखील जमावाला विनंती करतो, मात्र ते काहीही ऐकून घेत नाहीत. यावेळी एक व्यक्ती तर तरुणीने जीन्स घातली आहे यावरही आश्चर्य व्यक्त करत असल्याचे व्हिडीओत ऐकू येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी हिंदू तरुणासोबत फिरत असल्याचा संशय आल्याने त्या लोकांनी त्यांना जबरदस्ती थांबवले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र स्कूटर थांबवणाऱ्या दोघांना बोलावून पोलिसांनी पुन्हा असे कृत्य करु नये अशी ताकीद दिली आहे.
पोलीस अधिकारी आर.एस.वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एक तरुणी आणि तरुण दुपारी इस्लाम नगरमध्ये आले होते. यावेळी काही लोकांनी त्यांना थांबवलं आणि तरुणीला हिजाब काढत चेहरा दाखवण्यास सांगितलं. तरुणी मुस्लिम आणि तरुण हिंदू असल्याचा त्यांना संशय होता”. “याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र व्हिडीओत दिसणाऱ्या दोघांना पुन्हा असं कृत्य करु नये अशी ताकीद दिली आहे,” माहिती वर्मा यांनी दिली.