नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद आज पुन्हा वाढली आहे. कारण आज तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमाने उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमाने खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमाने भारतात आली आहेत.
Second batch of IAF #Rafale aircraft arrived in India at 8:14 pm on 04 Nov 20 after flying non-stop from France.
— Indian Air Force (@IAF_MCC) November 4, 2020
26 जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमाने भारतात दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.
दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.
जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 ही लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.