वॉशिंग्टन – अमेरिकेने सीरियात जे हवाई हल्ले केले आहेत त्यात अलकायदाचे किमान सात म्होरके ठार झाले आहेत असा दावा अमेरिकेने केला आहे. इडलिब प्रांतात अलकायदाच्या नेत्यांची बैठक चालू असतानाच तेथे त्यांच्यावर हे हवाई हल्ल करण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या प्रवक्त्या मेजर बेथ रिऑर्डन यांनी सांगितले की, 22 ऑक्टोबर रोजी हा हल्ला करण्यात आला.
त्यात अलकायदाचे सात प्रमुख नेते ठार झाल्याची खातरजमा झाल्यानंतर अमेरिकेतर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. तथापि या नेत्यांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. या हल्ल्यामुळे अलकायदाला मोठा हादरा बसला असून आता त्यांची मारक क्षमता कमी झाली आहे असेही त्यांनी सांगितले.
सीरियात सध्या मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. त्याचा लाभ घेऊन आपल्या संघटनेचे बस्तान त्या देशात बसवण्याचा प्रयत्न अलकायदाने चालवला होता. त्याला आळा घालण्यासाठी अमेरिकेने त्यांच्या ठिकाणांवर हे हवाई हल्ले केले. यापुढील काळातही आम्ही सीरियात असे हल्ले करून अलकायदा नेस्तानबूत करून टाकू असा निर्धारही अमेरिकेने व्यक्त केला आहे.