वॉशिंग्टन – तैवानला विविध प्रकारची सामग्री निर्यात करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर चीनने निर्बंध लागू करण्याचा निर्णय काल जाहीर केला आहे. असे असताना अमेरिकेने मात्र त्यांचे हे निर्बंध झुगारून तैवानला 2.37 अब्ज डॉलर्स किंमतीची हार्पुन क्षेपणास्त्रे निर्यात करण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्या संबंधीची अधिसूचनाही अमेरिकेने जारी केली आहे.
तैवान मध्ये स्थीरता आणि शांतता प्रस्थापित राहणे याला आमचे प्राधान्य असून त्यांच्या संरक्षण सिद्धतेसाठी त्यांना आम्ही हार्पुन क्षेपणास्त्र निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. आमच्या या निर्णयाने त्या भागातील लष्करी संतुलन बिघडणार नाही असा दावाही अमेरिकेने केला आहे. हार्पुन क्षेपणास्त्रे जहाजांवर तसेच जमीनीवरील लक्ष्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. तसेच त्यात 500 पौंड वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
सोमवारीच चीनने अमेरिकेच्या बोईंग, लॉकहीड मार्टिन आणि अन्य संरक्षण कंपन्यांवर तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा केल्याच्या कारणावरून निर्बंग लागू केले होते. आता अमेरिकेन हा जो नवीन निर्णय घेतला आहे त्यावरील चीनची प्रतिक्रीया मात्र लगेच समजू शकलेली नाही. मात्र या निर्णयावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता अधिक आहे.