राजगुरूनगर(प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कनेरसर, गोसासी, भीमाशंकर आणि आंबोली, पाईट येथील गरजू कुटुंबीयांना अन्न धान्य किराणा किटचे वाटप रोटरी क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी, रोटरी क्लब पुणे सेंट्रल व रोटरी क्लब राजगुरूनगर मार्फत करण्यात आले असल्याची माहिती राजगुरूनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी दिली.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूचे संकट आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानावर झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून अनेक गोरगरीब नागरिकांना रोजगार नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असताना रोटरी क्लब माध्यमातून अशा कुटुंबाना किराणा किट वाटप केले जात आहे. राजगुरूनगर रोटरी क्लबच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावातील सर्वसामान्य गरीब कुटूंबाना मदतीचा प्रस्ताव पुणे रोटरी क्लबकडे अध्यक्ष राहुल वाळुंज, माजी अध्यक्ष अविनाश कोहिनकर यांनी मांडला होता. त्याला तात्काळ बिबवेवाडी पुणे रोटरी क्लबने मान्यता देत किराणा किट उपलब्ध केले.
कनेरसर 27, गोसासी 43, भीमाशंकर 157, आंबोली-पाईट 18 असे एकूण 245 कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी एसजी ऍनालॅटीकचे सुशांत गुप्ता, रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी अध्यक्ष अंकुश पारेख यांचे मोठे सहकार्य लाभले. तर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे 157 गरजू गरीब कुटुंबांना नुकतेच किराणा किटचे वाटप राजगुरूनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज, सचिव चक्रधर खळदकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, रोटरीचे जयंत घोरपडे, माउली करंडे, अजित वाळुंज, सुधीर येवले आदी उपस्थित होते.