नवी दिल्ली – दिल्लीत भाजपच्या महापालिकांकडून तेथील रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना वेतनच दिले गेले नाही, त्यामुळे संपावर गेलेल्या डॉक्टरांवरच भाजपचे लोक गुंडागर्दी व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या संपाला पाठिंबा देणाऱ्या हिंदुराव हॉस्पिटलच्या चार सीएमओंची बदली करण्यात आली असून या बदली मागे हीच दहशत निर्माण करण्याची भावना आहे असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.
हिंदुराव हॉस्पिटल हे उत्तर दिल्ली महापालिकेच्या अखत्यारीत असून ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. तेथील चार मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. येथील डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक यांनी सांगितले की या डॉक्टरांनी संप मागे घ्यावा म्हणून भाजपचे पदाधिकारी त्यांना धमकावत आहेत.
संपकऱ्यांचा पगार न देता दडपशाहीने भाजपला हा प्रश्न सोडावायचा आहे असा आरोपही त्यांनी केला. वेतनाच्या मागणीसाठी या रुग्णालयाचे पाच डॉक्टर्स गेल्या शुक्रवारपासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. या आधीही वेतन न मिळालेल्या महापालिका डॉक्टरांनी जंतरमंतरवर निदर्शने केली आहेत.