काही दिवसांपूर्वी प्रत्येक टीव्ही चॅनलवर बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या व्हॉट्सअॅप चॅटचा सविस्तर तपशील झळकत होता. हे चॅट लिक झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न येऊ लागले आहेत की व्हॉट्सअॅप खरोखर सुरक्षित आहे का? व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे लोकांना वाटत होतं की, त्यांचे व्हॉट्सअप चॅट कोणीही वाचू शकत नाही किंवा चॅट डिलीट झाल्यानंतर पुन्हा मिळवता येणार नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या चॅट लिकच्या घटनांनी सगळ्यांना संभ्रमात टाकले आहे. काय आहे यामागील कोडे? व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचे काय? आपले चॅट हॅक होऊ द्यायचे नसतील तर काय करणे गरजेचे आहे? यासाठी हे वाचायलाच हवे!
सायबर तज्ञांच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असे लिहिले आहे की, व्हॉट्सअॅपवर युजरने शेअर केलेली माहिती ही सार्वजनिक माहिती आहे आणि त्यास गोपनियतेचे धोरण लागू होत नाही. हेदेखील खरे आहे की, व्हॉट्सअप चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईल, कंप्युटरवरुन मेसेज पाठवता, तो मेसेज पाठवल्यानंतर कोणतीही तिसरी व्यक्ती तुमचा मेसेज वाचू शकत नाही. परंतु मेसेज पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला की कोणीही तुमचं चॅट अगदी सहजरित्या हॅक करु शकतं.
तुम्ही कोणाला आणि काय पाठवत आहात, तुम्ही कोणत्या ग्रुपचे सदस्य आहात याबाबतची माहिती कंपनी साठवून ठेवते. व्हॉट्सअप 2016 पासून त्यांच्या युजर्सची माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करत आहे. याचाच अर्थ ते सर्व युजर्सचं प्रोफायलिंग करतात. त्यामुळेच जर तुम्ही कोणताही विचार न करता तुमची कोणतीही माहिती शेअर करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
तुमचं व्हॉट्सअप चॅट हॅक होऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ टिप्स वापरा :
व्हॉट्सअप त्यांच्या युजर्सना टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनची सुविधा देतं. या फिचरचा वापर करताना व्हॉट्सअप तुम्हाला सहा अंकी कोड विचारतं. ज्याद्वारे कोणताही हॅकर तुमचं व्हॉट्सअप हॅक करु शकत नाही. जर कोणत्याही हॅकरने तसा प्रयत्न केला तर व्हॉट्सअप त्यला सहा अंकी कोड मागेल. जो कोड त्या हॅकरकडे नसल्यामुळे तो तुमचं अकाऊंट हॅक करु शकत नाही.
जर तुम्ही व्हॉट्सअप चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राईव्ह, आय क्लाऊड किंवा इमेलवर ठेवत असाल तर तुम्ही जास्त सावध असणं आवश्यक आहे. व्हॉट्सअप चॅटचा बॅकअप घेत असताना एंड टू एंड एन्क्रिप्शन बंद होतं. याचाच अर्थ जे चॅट केवळ दोन युजर्समध्ये मर्यादित होतं ते चॅट आता दुसऱ्या सिस्टिमवरदेखील आहे. त्यामुळेच ते चॅट सुरक्षित राहात नाही. विशेष म्हणजे तुम्ही जर ते चॅट डिलीट करत असाल तर एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी की, ते चॅट तुम्ही गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडवरुनही डिलीट करायला हवं.