नवी दिल्ली – कोणत्याही प्रवासाला जाताना आपल्याला सर्वात महत्त्वाची जोखीम असते ती आपल्या बॅगा सांभाळण्याची. सहसा एक प्रवासी जास्तीतजास्त दोन बॅगांची वाहतूक करु शकतो. त्यामुळे प्रवासाला जाताना अनेकजण कमीतकमी साहित्य बरोबर नेण्याचा पर्याय निवडतात. मात्र आता रेल्वे विभाग प्रवाशांची ही चिंता दूर करणार आहे. घरापासून स्टेशनपर्यंत अथवा स्टेशनपासून घरापर्यंत तुमच्या बॅगांची वाहतूक आता “बॅग्ज ऑन व्हील्स’ या योजनेखाली एका ऍपद्वारे केली जाणार आहे. अशा प्रकारे, भारतीय रेल्वे पहिल्यांदाच “बॅग्ज ऑन व्हील्स’ ही सेवा देण्याची तयारी करत आहे.
उत्तर रेल्वेच्या दिल्ली मंडळाच्या रेल्वे प्रवाशांसाठी ऍप आधारित “बॅग्ज ऑन व्हील्स’ ही यशस्वीरित्या सेवा सुरु करण्यात आली आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजीव चौधरी यांनी सांगितले की, रेल्वे महसूल वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यानुसार दिल्ली विभागामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सामान त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. या योजनेचा फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार आहे.
बीओडबल्यू (“बॅग्ज ऑन व्हील्स’) ऍप अँड्रॉईड आणि आयफोनवरही वापरता येणार आहे. या ऍपवरून रेल्वे प्रवासी त्यांच्या घरातून रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरापर्यंत बॅगा किंवा सामान पोहोचविण्याचे काम होणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांचा बुकिंगनुसार कोच क्रमांक, सीट क्रमांक आणि घराचा पत्ता द्यावा लागणार आहे. रेल्वेने निवडलेला ठेकेदार प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे त्या ठिकाणी नेऊन देणार आहे. म्हणजेच या ऍपवर बुकिंग केल्यास प्रवाशांना रिकाम्या हातांनीच रेल्वे स्थानक किंवा घरी जायचे आहे. बॅगा उचलून टॅक्सीत टाकणे किंवा सांभाळण्याची कटकट वाचणार आहे.