स्वयंसेवक, कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण
पुणे – राज्य शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतील दुसऱ्या टप्प्याला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी (दि. 21) सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत स्वयंसेवक, कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन 3 लाख 34 हजार 378 कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये सापडलेल्या 1 हजार 629 संशयितांपैकी 280 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही या मोहिमेचा फायदा होत असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बाधित संख्या सापडल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संपूर्ण राज्यभर राबविण्यास सुरवात केली. या मोहिमेचा पहिल्या टप्प्यात पुणे ग्रामीण भागाला चांगला फायदा झाला. ऑक्टोबर महिन्यात बाधितांचे वाढते प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. त्यावरून करोनाचा वाढती संसर्ग साखळी तोडण्यात यश आल्याचे दिसून येते.
या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यासह अन्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेत आहे. 1 हजार 305 पथकांनी घरोघरी जाऊन 3 लाख 34 हजार 378 कुटुंबातील 14 लाख 67 हजार 279 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दीड महिन्यापासून अभियान जनजागृती राबविण्यात येत आहे. आरोग्य पथकाकडून करण्यात येणाऱ्या तपासणीस नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. जेणेकरून करोना संसर्गाची साखळी तुटेल.
– प्रमोद काकडे, सभापती, आरोग्य व बांधकाम, जि.प.पुणे