इस्लामाबाद – पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका चार मजली इमारतीमध्ये झालेल्या एका शक्तिशाली स्फोटामुळे किमान 5 जण ठार झाले आणि 15 जण जखमी झाले आहेत. कराची शहरातील गुलशन ए इक्बाल भागातील मस्कर चौरंगी भागातील या इमारतीचे किमान दोन मज्ले या स्फोटात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या स्फोटात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटानंतर सुरक्षा दलांनी या भागाची नाकाबंदी केली असून या स्फोटाचे नेमके स्वरुप आणि त्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल स्थानिक अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. हा स्फोट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाला असल्याचा संशय आहे. या स्फोटामुळे शेजारच्या इमारतींच्या खिडक्यांची तावदानेही फुटली. तसेच रस्त्यांवरील काही वाहनांच्या काचाही फुटल्या, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले.