मुंबई – दागिने उद्योगासमोरील अडचणी अजूनही कायम आहेत. त्यामुळे यावर्षी दागिने उद्योगाची निर्यात 20 ते 25 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उद्योगाला मदतीची गरज आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगावर झालेला परिणाम आणखी संपुष्टात आलेला नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये या उद्योगाची निर्यात 2,52,249 कोटी रुपयांची झाली होती.
ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष कॉलिन शाह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीवर परिणाम होणार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मागणी वाढू लागली आहे.
निर्यात पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी 2021-22 उजाडेल असे त्यांनी सांगितले. दागिन्यांची निर्यात वाढावी म्हणून आयोजित केलेल्या व्हर्च्युअल प्रदर्शनाला या संघटनेच्या सदस्यांना प्रत्यक्ष भाग घेता आला नाही. या प्रदर्शनामध्ये तरीही 330 सदस्यांनी भाग घेतला. विविध देशांतील 10 हजार ग्राहकांनी या माध्यमातून खरेदी केली. त्यामध्ये 1,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
आगामी काळातही दागिने उद्योगाला अशा प्रकारची व्हर्च्युअल प्रदर्शने आयोजित करावी लागणार आहेत.त्यामुळे संघटनेचे सदस्य परस्परांच्या संपर्कात राहतील. परिस्थिती सुधारल्यानंतर उत्पादने उपलब्ध व्हावीत याकरिता दागिने उत्पादकांनी तयारी चालू ठेवली आहे.
मात्र, दरम्यानच्या काळात सरकारने जर सोन्यावरील आयात शुल्क कमी केले तर या उद्योगाला मदत होणार आहे, असे शाह म्हणाले.