सातारा -करोनाच्या संक्रमण काळात अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी शाहूनगरी सज्ज होऊ लागली आहे. सार्वजनिक मंडळाकडून होणाऱ्या देवी प्रतिष्ठापनाबाबत स्वतंत्र नियमावली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून स्वतंत्र मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. घरगुती घटस्थापनेकरिता घट, वावरी, नारळ, पंचधान्य यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी रिमझिम पावसात राजवाडा येथील गोलबागेच्या परिसरात गर्दी केली होती.
गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाला करोनाचे ग्रहण लागले आहे. कुंभारवाडयात दरवर्षी दुर्गादेवीच्या मूर्ती तयार होऊन रंगकाम सुरू असते. यंदा सार्वजनिक दुर्गा मंडळांनी मूर्ती तयार करण्याचा ऑर्डर दिल्या नाहीत. यामुळे दीड फूट उंचीच्या मूर्ती बनवण्यात आल्याचे मूर्तीकार संजय कुंभार यांनी “प्रभात’ला सांगितले. यंदाचा गणेशोत्सव करोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या गणेशोत्सवानंतर 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी उत्सव साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असते.
या उत्सवात दुर्गा देवीच्या मूर्तीचे विशेष आकर्षण असते. दरवर्षी 10 ते 11 फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्यात येतात. मात्र, यंदा देवीची मूर्ती केवळ चार फूटापर्यंत उंचीची असावी, असे बंधन जिल्हा प्रशासनाने घातले आहे. शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळे भव्य अशी दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. परंतु यावर्षी भव्य मूर्ती दिसणार नाही. उत्सव रद्द होण्याच्या भीतीने दुर्गा मंडळांनी कुंभारवाडयात मूर्ती बनवण्याच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत.
कुंभारवाडयात मूर्तीकारांनी दीड फूट उंचीच्या मूर्ती बनवल्या आहेत. मागणी कमी असल्याने फक्त 50ते 125 मूर्ती तयार आहेत. या मूर्ती दोन हजार ते अडीच हजार रूपये किमतीच्या आहेत. शाडूच्या मूर्ती बनवण्यावर भर दिल्याचे मूर्तीकार कुंभार यांनी सांगितले. सातारा शहरात नवरात्रोत्सवाचा उत्सव दांडिया गरबा नसल्याने सुनासुना वाटणार आहे.