ग्रंथालय उघडण्यास राज्य शासनाच्या परवानगीचे स्वागत; शहरात पालिकेची परवानगी नाही
पुणे – राज्यातील ग्रंथालये खुली करण्यासाठी राज्य सरकारकडून बुधवारी परवानगी देण्यात आली. मात्र, पुणे महानगरपालिकेने यासंदर्भातील कोणताही आदेश दिला नसल्याने पुण्यातील ग्रंथालये उघडणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाबाबत “देर आए’, दुरुस्त आए’ म्हणत पुस्तकप्रेमींकडून स्वागत करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या सर्व आस्थापना हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. वाचकांना “बौद्धिक खुराक’ पुरवणारी ग्रंथालये देखील याला अपवाद नव्हती. सुमारे 8 महिने ग्रंथालये बंद असल्याने, ग्रंथालयाला बसलेल्या आर्थिक फटक्यासह वाचकांना वाचन साहित्य देखील मिळत नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून सातत्याने “ज्ञानमंदिराची दारे’ खुली करण्याची मागणी करण्यात येत होती. बुधवारी अखेरीस राज्य सरकारने ग्रंथालये सुरू करण्याची परवानगी दिली.
पुणे जिल्ह्यात सुमारे 500 पेक्षा अधिक ग्रंथालये शासनमान्य आहेत. मात्र, पुण्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालये सुरू करण्याबाबत महापालिकेकडून याबाबत सूचना स्पष्ट न केल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाचनाला प्रोत्साहन देण्यात येते. याच दिवशी ग्रंथालये सुरू होणार असल्याचे पुस्तकप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. येत्या काळात ग्रंथालयांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर, पुस्तकांचे निर्जंतुकीकरण आदी प्रकारची काळजी ग्रंथालय चालकांना घ्यावी लागणार आहे. यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने रचना करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय वाचकांना देखील मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.
पुण्यातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत विशेष सूचना मिळालेल्या नाहीत. ग्रंथालये सुरू करता सॅनिटायझर, मास्क वापराच्या बरोबरीने पुस्तकांच्या निर्जंतुकीकरणाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
– विकास टिंगरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ
गुरुवारपासून ग्रंथालय सुरू करण्याची तयारी केली आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
– शरद घाणेकर, पुणे मराठी ग्रंथालय