इस्लमाबाद- काही देशांचा सक्त विरोध असतानाही पाकिस्तानची आज संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार कौन्सिलवर पुन्हा सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक मते घेऊन पाकिस्तानने हे सदस्यत्व मिळवले आहे. हे सदस्यत्व मिळवण्यासाठी उझबेकिस्तान, नेपाळ, चीन आणि सौदी अरेबिया हे देश उत्सुक होते. त्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात पाकिस्तानला सर्वाधिक म्हणजे 169 मते मिळाली असून उझबेकिस्तानला 164, नेपाळला 150, चीनला 139 ते सौदी अरेबियाला केवळ 90 मते मिळाली.
संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार कौन्सिलचे एकूण 47 सदस्य आहेत. तथापि नियमानुसार यावर्षी यातील 15 सदस्यांची त्यात्या प्रदेशानुसार निवड झाली. यापैकी 14 सदस्य देश बिनविरोध निवडून आले तर अशिया-पॅसिफीक विभागातील जागेसाठी ही निवडणूक झाली. पाकिस्तानचा मानवाधिकाराच्या संबंधातील इतिहास आणि त्यांचे एकूण रेकॉर्ड अत्यंत खराब आहे त्यामुळे पाकिस्तानसह चीन, रशिया, क्युबा, या देशांना या समितीवर निवडून देऊ नये असे आवाहन युरोप, अमेरिका आणि कॅनडा या देशांनी केले होते.