नवी दिल्ली – पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी नवीन दहशतवाद प्रशिक्षण तळ सुरू केला आहे. तिथे सुमारे ६० दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जाते आहे, असे संयुक्त राष्ट्राने एका अहवालामध्ये म्हटले आहे.
इसिल, अल कायदा आणि संबंधित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या ऍनालिटीकल सपोर्ट ऍन्ड सॅन्कशन्स मॉनिटरींग टीमने आपल्या अहवालामध्ये टीटीपीचे पाकमधील जाळे अधिकच सक्षम झाल्याचे म्हटले आहे. टीटीपीने या नेटवर्कच्या माध्यमातूनच सीमाभागात मोठ्या प्रमाणावर हल्ले करायला सुरुवात केली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
टीटीपीला तालिबानची सहानुभूती आहे, असे मानले जाते. शस्त्रे आणि दारुगोळा पुरवण्याबरोबर अल-कायदाशी संबंधित गट टीटीपीला सीमेपलिकडून मदत करत असतात, असेही या अहवालात म्हटले आहे. टीटीपीचा नवीन तळ गेल्या वर्षी खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सुरू करण्यात आला. तिथे आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जाते आहे. टीटीपीचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना नियमित पॅकेजही दिले जाते. अल-कायदाशी संबंधित गटांकडून या सदस्यांना प्रशिक्षण, वैचारिक मार्गदर्शन आणि मदतही दिली जाते.
टीटीपीच्या कारवायांमुळे मध्य आणि दक्षिण आशियातील धोका वाढला आहे.सीरिया आणि इराकमधून इसिल आणि अफगाणिस्तानमधील लेवांट-खोरसान या संघटनांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता टीटीपीला पाकिस्तानमध्ये प्रबळ बनवण्यासाठी वापरले जाते आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
टीटीपीची उपशाखा म्हणून तेहरिक ए जिहाद पाकिस्तान ही नवी संघटना उदयाला येत आहे. या दोन्ही संघटनांमध्ये प्रामुख्याने अफगाणींना भरती करून घेतले जाते आहे, असेही एका सूत्राने म्हटले आहे.