वरंधा घाटात मित्राचाच काटा; 600 फूट दरीत मिळाला सांगाडा
पुणे – दरोड्याच्या गुन्ह्यात अटक आरोपींच्या चौकशीत दीड वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. संबंधीत आरोपींनी त्यांच्या मित्राला फिरण्याच्या बहाण्याने वरंधा घाटात नेले. तेथे त्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह खोल दरीत टाकला. पोलिसांनी ट्रेकरच्या सहाय्याने तब्बल 600 फूट खोल दरीतून मृताचा सांगाडा हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.
पोलीस पथकाने 7 ऑक्टोबर रोजी दरोड्याच्या तयारीतील सराईतांना पकडले होते. गणेश यशवंत चव्हाण (वय 23), विशाल श्रीकांत जाधव (वय 32), सुनील शंकर वसवे ( वय 23, सर्व रा. बिबवेवाडी) यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांचा सहकारी दशरथ अरुण शिंदे (रा.कासुर्डी) हा पळून गेला. यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सात दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती.
या कोठडीत खुनाचा गुन्हा उघडकीस आला. त्यांनी त्यांचा मित्र दीपक बापू वाडकर (21, रा. बिबवेवाडी) याचा खून केला होता. दीपक हा आरोपींना वारंवार शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. तसेच त्याच्याबरोबर आरोपींचे पैशाचेही वाद होते.
यामुळे दीपकचा काटा काढायचे आरोपींनी ठरवले होते. त्यानुसार त्याला वरंधा घाटात फिरायला घेऊन गेले. तेथे त्याला दारु पाजून कोयत्याने वार करत खून केला. यानंतर त्याला खोल दरीत फेकून दिले.
याप्रकरणी पोलिसांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चौकशी करता दीपकच्या घरच्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केल्याचे आढळले. आरोपींच्या सांगण्यानुसार पुण्यातील द अल्पायनिस्ट गिर्यारोहण संस्थेची मदत घेऊन 600 फूट खोल दरीत ट्रेकर्सना उतरवले. तेथे त्यांना झाडाझुडपात दीपकचा सांगाडा मिळला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार आंब्रे, उसूलकर, पोलीस कर्मचारी तारु, भिलारे, चोरमले, फरांदे, शेख, मदने यांच्या पथकाने केली. गिर्यारोहण संस्थेचे भगवान चवळे, अक्षय शेलार, अक्षय भोकरे, सुनील बलकवडे, सुमीत गावडे यांनी सहकार्य केले.