वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन हे विजयी झाले तर महिनाभरात कम्युनिस्ट विचारांच्या कमला हॅरिस या अमेरिकेचे अध्यक्षपद बळकावतील असा घणाघाती आरोप अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
काल रात्री कमला हॅरिस आणि माईक पेन्स या उपाध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांची पहिली जाहीर चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी वरील भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, कालची चर्चा ही वादविवाद स्पर्धाच म्हणता येणार नाही, काल कमला हॅरिस यांचा सहभाग हॉरिबल होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्याच लायकीचे नव्हते, त्या कम्युनिस्ट आहेत. अ
ध्यक्षपदी जो बिडेन निवडून आले तर ते दोन महिन्यापेक्षा अधिक काळ अध्यक्षपदावर राहू शकत नाहीत, मला तर वाटते आहे की बिडेन निवडून आल्यानंतर महिनाभराच्या अवधीतच कमला हॅरिस त्यांच्याकडून अध्यक्षपद हिसकाऊन घेतील असे ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कमला हॅरिस या सोशॅलिस्ट नाहीत तर त्या त्याही पेक्षा भयानक म्हणजे कम्युनिस्ट आहेत. त्यांना आपल्या देशाची सीमा खुनी, बलात्कारी लोकांसाठी खुली करायची आहे असा आरोपही त्यांनी केला.