पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रेमीयुगुलांचा वाढला वावर
पिंपळे निलख – शहरात विविध ठिकाणी महापालिकेचे मोकळे भूखंड आहेत. तसेच काही दुर्लक्षित ठिकाणी किंवा रस्त्याच्या मध्ये सुशोभीकरणासाठी असलेल्या जागांमध्ये तळीरामांचा वावर वाढला आहे. सकाळपासूनच ते येथे जमायला सुरुवात होते. दिवसा व रात्री उशिरापर्यंत दारू पिण्यासाठी व प्रेमीयुगुलांना टाइमपास करण्यासाठी सध्या मोकळ्या जागांचा उपयोग होत आहे. परंतु पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपळे निलख व सांगवी, चिखली परिसरातील मैदाने व आडोशाच्या ठिकाणी मद्यपानासाठी आश्रयस्थान झाले असल्याचे दिसून येत आहे. मैदानाच्या शांततेचा व मैदानावरील आडोशाचा मद्यपी व प्रेमीयुगुल गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे. पीडब्ल्यूडी मैदानाच्या समोर हाकेच्या अंतरावर असलेल्या सांगवी पोलीस स्टेशनकडून मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने सकाळपासूनच तळीरामांचा येथे वावर असतो.
पोलिसांची भीती नसल्याने ते बिनधास्तपणे येथे पार्ट्या करताना दिसून येतात. या ठिकाणी दारूच्या व बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. त्यासोबत संध्याकाळी मैदानावर असलेला अंधार व आडोशाला अनेक प्रेमीयुगुल नागरिकांना व महिलांना लज्जा वाटेल अशा पद्धतीने वागतात व परिसरात खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना व पालकांना हा सर्व प्रकार बघून खाली मान घातल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत कोणी बोलल्यास त्यास दमदाटी व धाक दाखविण्यात येत असल्याने याविरोधात कोणी तक्रार करीत नसल्याचे नागरिक व पालक सांगतात.
पीडब्ल्यूडी मैदानाच्या पूर्व बाजूला असलेल्या महापालिका उद्यान व बॅडमिंटन हॉलच्या आडोशाला अनेक प्रेमीयुगुल बसलेली असतात. तर दक्षिण बाजूकडील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये ओट्यावर बसून अनेक तरुण मद्यपान करतात व मद्यपान केल्यानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्या व अर्धवट खाललेले पदार्थ तसेच फेकून निघून जातात.
त्यामुळे या परिसरात फुटलेल्या बाटल्यांच्या काच धोकादायक पद्धतीने अस्ताव्यस्त पडलेले असून, यामुळे मैदानावर खेळणाऱ्या लहान मुलांना पायात काच जाऊन पाय व शरीराला इजा होण्याचा धोका आहे. या भागात दिवसा, संध्याकाळी व रात्री पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी मैदानावर येणाऱ्या लहान मुलांच्या पालकांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पोलीस बंदोबस्ताची गरज
मैदानावर असभ्य वर्तन करणाऱ्या तरुण-तरुणींना समज देऊन सोडण्यात येते. परंतु आहे तीच परिस्थिती पुन्हा दिसून येत आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस प्रशासनाने समोर घडणाऱ्या या प्रकारास आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच येथील बंदोबस्त व गस्त वाढविण्यात यावी. परिसरात सूचनाफलक लावावेत, अशी मागणी होत आहे.