अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अशा झाल्या निवडी…
पुणे – महापालिकेतील विषय समित्यांच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत साहजिकच भाजपची सरशी झाली. बहुमत असल्याने शहर सुधारणा, महिला-बालकल्याण, विधी आणि क्रीडा या विषय समित्यांवर सत्ताधारी भाजपने आपले वर्चस्व राखले.
विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी काही सदस्यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवून मतदान केले.
विषय समित्यांचे सदस्य निवडल्यानंतर करोनाचे संकट आल्याने मागील सहा महिन्यापासून विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका रखडल्या होत्या, त्या बुधवारी झाल्या. सत्ताधारी भाजपचे पालिकेत स्पष्ट बहुमत आहे. तरीही विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस या तिनही पक्षांनी एकत्रीत येत आघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देत उमेदवार उभे केले. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी काम पाहिले.
शहर सुधारणा समिती…
अध्यक्षपदी भाजप नगरसेवक प्रसन्न जगताप यांची निवड झाली, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश ढोरे यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्याच शीतल सावंत यांनी कॉंग्रेसच्या चॉंदबी हाजी नदाफ यांचा पराभव केला.
विधी समिती…
अध्यक्षपदी मनिषा लडकत यांची निवड झाली, त्यांनी शिवसेनेच्या संगीता ठोसर यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी मनिषा कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्विनी भागवत यांचा पराभव केला.
महिला-बाल कल्याण समिती
अध्यक्षपदासाठी भाजपच्या माधुरी सहस्त्रबुद्धे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हमीदा सुंडके यांच्यात निवडणूक झाली. यात सहस्त्रबुद्धे यांनी सुंडके यांचा पराभव केला. तर वृषाली चौधरी आणि शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांचा पराभव करत उपाध्यक्षपद मिळवले.
क्रीडा समिती…
अध्यक्षपदासाठी भाजपचे वीरसेन जगताप आणि कॉंग्रेसचे अविनाश बागवे यांच्या झालेल्या लढतीत जगताप यांनी बागवे यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी छाया मारणे यांनी राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर यांचा पराभव केला.