बोस्टन – अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऍलर्जी ऍन्ड इन्फेक्शियस डिसीसेज’ आणि मॉडर्ना या बायोटेक कंपनीने संयुक्तपणे विकसित केलेल्या कोविड-19 विरोधी लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप चांगला प्रतिसाद आढळून आला आहे.
वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांमध्ये प्रतिकारक्षमता चांगल्या प्रमाणात उत्पन्न झाली असल्याचे चाचणीदरम्यान आढळून आले आहे.
या संदर्भातील संशोधन ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘एमआरएनए-1273’ हे प्रायोगिक औषध 55 वर्षांपुढील वयाच्या ज्येष्ठ उमेदवारांनी सहज स्वीकारले, असे या अभ्यासामध्ये म्हटले आहे.
55 वर्षांवरील व्यक्तींना कोविड-19 च्या संसर्गाचा अधिक त्रास संभवू शकतो. तसेच काही वैद्यकीय गुंतागुंतही त्यांच्यात निर्माण होऊ शकत असल्याने अशा ज्येष्ठ उमेदवारांना या चाचणीसाठी निवडण्यात आले होते.
या प्रायोगिक औषधाच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना 16 मार्च 2020 पासून सुरुवात झाली. त्यानंतर महिन्याभराने या चाचणीसाठी ज्येष्ठ वयाच्या उमेदवारांनाही या चाचणीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. अशा 40 ज्येष्ठ उमेदवारांना ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये 56 ते 70 वयोगटातील 20 उमेदवार आणि 71 वर्षांपुढील 20 उमेदवार होते.
महिन्याभराने या उमेदवारांना या लसीचा दुसरा डोसही देण्यात आला होता. या सर्व उमेदवारांच्या वैद्यकीय चाचण्यांच्या निरीक्षणानुसार त्यांना ही लस मानवली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.