नवी दिल्ली – दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने विकसित केलेल्या “तैकोइप्लॅनिन’ला कोविड-19 वरील उपचारासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने मंजूरी दिली आहे. सध्या कोविड-19 वरील उपचारांसाठी वापरल्या जात असलेल्या अन्य काही औषधांपेक्षा “तैकोइप्लॅनिन’चा वापर दहापट अधिक परिणामकारक ठरू शकेल, असे “आयआयटी’ दिल्लीच्या संशोधनात म्हटले आहे.
“आयआयटी’ दिल्लीतील कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सने केलेल्या संशोधनादरम्यान मंजूरी असलेल्या आणि करोनाविरोधातील उपचारासाठी आघाडीवर असलेल्या 23 औषधांच्या एकत्रित परिणामांचा अभ्यास केला.
“तैकोइप्लॅनिन’ला मिळणाऱ्या प्रतिसादाची अन्य महत्वाच्या औषधांना मिळणाऱ्या औषधांच्या प्रतिसादाबरोबर तुलना केली. तेंव्हा लोपिन्विर आणि हायड्रोक्लोरोक्वीन या अन्य औषधांपेक्षा “तैकोइप्लॅनिन’ अधिक सरस असल्याचे आढळून आले आहे, असे “आयआयटी’दिल्लीतील प्राध्यापक अशोक पाटील यांनी म्हटले आहे.
अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनासाठी “एम्स’मधील डॉ. प्रदीप शर्मा यांनीही सहकार्य केले आहे. हे संशोधन “इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमोलेक्युल्स’मध्येही प्रसिद्ध झाले आहे.
“तैकोइप्लॅनिन’ चा वापर नेहमी ग्रॅम पॉझिटिव्ह जिवाणूंपासून होणाऱ्या संसर्गावरील उपचारासाठी नियमितपणे वापर केला जातो. “तैकोइप्लॅनिन’ बाबत अलिकडेच रोममधील सईपेन्झा विद्यापिठामध्ये एक वैद्यकीय संशोधन करण्यात आले होते. मात्र या औषधाबाबत अजूनही सविस्तर आणि वेगवेगळ्या टप्प्यांमधील संशोधन होणे गरजेचे आहे. विशेषतः कोविड-19 च्या रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने हे संशोधन व्हायला हवे, असे ते म्हणाले.