आरोग्य यंत्रणा कारभाऱ्याविनाच सुरू

प्रतिनियुक्तीवरील आरोग्य प्रमुख पॉझिटिव्ह असल्याने सुट्टीवर

पुणे- महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आला असून मुदतवाढीच्या डॉ. हंकारे यांच्या प्रस्तावावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरे प्रतिनियुक्तीवरील आरोग्य प्रमुख डॉ. नितीन बिलोलीकर हे देखील करोना पॉझिटिव्ह निघाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर आहेत. ऐन साथीच्या आजाराच्या काळात पुणे शहराची आरोग्य यंत्रणा कारभाऱ्याविनाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

करोनाची साथ अद्याप आटोक्यात आली नाही. त्यातून महापालिकेत राहण्याला डॉ. हंकारे राजी नसल्याचे सांगण्यात येत आहे; तर डॉ. बिलोलीकर कधी रुजू होणार? याचेही उत्तर प्रशासनाकडेही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शहराची मुख्य धमनी असलेला आरोग्य विभाग पूर्णवेळ अधिकाऱ्याविना राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेतील आरोग्य प्रमुखपदावर डॉ. हंकारे यांची 25 सप्टेंबर 2018 मध्ये प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. ती पुढच्या दोन वर्षांसाठी असल्याचे राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत संपली आहे. तत्पूर्वी त्यांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे आहे. परंतु, यावर गेला महिनाभर त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी, डॉ. हंकारे यांना मुदतवाढ मिळणार की, नव्या आरोग्य प्रमुखाची नेमणूक होईल, याबाबत औत्स्युक्य आहे.

दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डॉ. बिलोलीकर यांची निवड करण्यात आली. दोन आरोग्य प्रमुख मिळाल्याने काहीतरी सकारात्मक बदल घडेल असे वाटले असतानाच करोनाची बाधा झाल्याने डॉ. बिलोलीकर रजेवर गेले. ते अद्याप रुजूच झाले नाहीत. याच काळात डॉ. हंकारेही आजारी असल्याने सुट्टीवर होते. त्यामुळे काही दिवस आरोग्य प्रमुखाची जबाबदारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.