मराठी चित्रपटसृष्टी व सर्व कलाकार यांच्या समस्या सोडवण्याबद्दलही चर्चा
पुणे(प्रतिनिधी) : पुणे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी लक्ष घालून याबाबत महापालिका प्रशासनाला विचारणा करून कारवाई करण्यासंबंधी सूचना करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज दिले.
मराठी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा ह्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यात, कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईत वैयक्तिक लक्ष घालून राणावत यांना बोलवून घेत भेट दिली, त्याप्रमाणे मी सुद्धा मराठी चित्रपट निर्माता आहे व पुण्यात बांधकाम व्यावसायिक देखील आहे, माझा पुणे महापालिकेच्या हद्दीत हडपसर येथे एक छोटासा प्रकल्प आहे, ह्या भागात बरीच बेकायदेशीर बांधकाम गेल्या चार-पाच वर्षात झालेली आहे व तक्रारी करूनही त्यावर काहीही कारवाई आजपर्यंत झाली नाही, याकडे लक्ष वेधले होते.
कंगणा राणावत यांचे बांधकाम बेकायदेशीर होते; परंतु माझे बांधकाम कायदेशीर आहे. माझ्या सारख्या कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणार्याला सरकारकडून संरक्षण मिळावे व मराठी चित्रपट निर्मात्याला आपले म्हणणे मांडायची संधी मिळावी, हे मुद्दे त्यांनी पत्रात मांडले होते. त्याची दखल घेऊन राज्यपालांनी नवलाखा आज दुपारी साडेबारा वाजता भेटीचे निमंत्रण दिले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी देखील नवलाखांसोबत भेट घेतली. नवलाखा यांनी सदानंद मोरे लिखित ‘लोकमान्य ते महात्मा’ ह्या कादंबरीचे दोन्ही खंड व चिनार पब्लिकेशनचे कारगिल काॅफी टेबल बुक आदी साहित्य त्यांना भेट दिले.
नवलाखा यांनी बांधकाम व्यवसाय व महानगरपालिकेतील कारभार आणि समस्यांबाबत चर्चा केली त्यांवर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, या प्रश्नी पुणे महापालिकेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. कोविडमुळे उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत राज्यपालांबरोबर चर्चा झाली, असे नवलाखा म्हणाले.
मेघराज भोसले यांनी महाराष्ट्रातल्या आठ लाख कलाकारांच्या व्यथा मांडल्या व महाराष्ट्र सरकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र बोर्ड तयार करुन त्यांचा आरोग्य विमा आणि घरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपाल यांनी योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले, असे राजेभोसले यांनी सांगितले.