मुंबई – दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप याच्यावर करण्यात आलेल्या वादाच्या प्रकरणात आपले नाव विनाकारण घेतल्याबद्दल अभिनेत्री हुमा कुरेशी चिडली आहे. अनुरागने आपल्यासोबत कधीच गैरवर्तन केले नव्हते, असा खुलासाही तिने केला आहे. तसेच ज्यांच्याशी त्याने असे गैरवर्तन केले असेल त्यांनी संबंधितांकडे तक्रार करावी अशी सूचनाही हुमाने केली आहे.
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुरागच्या गॅंग्ज ऑफ वासेपुर या चित्रपटात हुमा कुरेशीने काम केले होते. आपण त्यानंतर त्याच्यासोबत काम केले नाही. मात्र तो एक चांगला मित्र असून एक सक्षम दिग्दर्शक असल्याचे हुमाने म्हटले आहे. आपल्या माहितीनुसार अनुरागने आपल्यासोबत अथवा अन्य कोणासोबत गैरवर्तन केले नसल्याचा दावाही तिने केला.
कोणासोबत तो चुकीचे वागला असेल तर त्यांनी याची तक्रार प्रशासन, पोलिसांकडे करायला हवी. सोशल मीडियावरील भांडणे आणि मीडिया ट्रायल्सवर आपला विश्वास नसल्याने आपण आतापर्यंत गप्प होतो, असेही तिने नमूद केले.
आपल्याला विनाकारण या वादात ओढल्याबद्दल संताप व्यक्त करताना ती म्हणाली हा केवळ माझा प्रश्न नाही किंवा मी स्वत:पुरते बोलत नसून अशा आरोपांमुळे ज्यांचे अनेक वर्षांचे कष्ट झाकोळले अथवा दबून जातात त्या प्रत्येक महिलेच्या वतीने आपण हे बोलत असल्याचे हुमाने नमूद केले.
मी टू च्या पावित्र्याची काळजीने रक्षा करायला हवी असे सांगतानाच आपले हे शेवटचे उत्तर आहे, आता या विषयावर आपण पुन्हा बोलणार नसल्याचे तीने जाहीर केले.
पायल घोष या अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. त्यात हुमाचेही नाव आल्यामुळे तीने हा खुलासा केला आहे.