मस्क यांची स्टीव्ह जॉब्सशी तुलना होऊ शकत नाही
वॉशिंग्टन – ऍपल कंपनीचे दिवंगत संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे एक कमालीचे सृजनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना टेस्ला कंपनीचे संस्थापक ऍलन मस्क यांच्याशी केली जाऊ शकत नाही, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि परस्परांच्या कामावरून गेट्स आणि ऍलन मस्क यांच्यादरम्यान अनेकदा जाहीर खटके उडत असतात. आता गेट्स यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ऍलन मस्क म्हणजे स्टीव्ह जॉब्स नव्हे. गेट्स यांनी असे म्हटले आहे की, ऍलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कारमधील तंत्रज्ञान इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी कमी दर्जाचे आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी केलेल्या कामामुळे जगाच्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. मात्र, अनेकदा स्टीव्ह जॉब्स यांची जागा ऍलन मस्क यांनी घेतली आहे, असे वातावरण काहीजण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते बरोबर नाही, असे गेट्स यांचे म्हणणे आहे.
ऍलन मस्क हे स्टीव्ह जॉब्ससारखे आहेत का, असा प्रश्न मुलाखतकर्त्याने केला असता बिल गेट्स म्हणाले की, अशी तुलना करणे बरोबर होणार नाही. ऍलन मस्क कार्यक्षम अभियंते आहेत, तर स्टीव्ह जॉब्स डिझाईन आणि लोक ओळखण्यात आणि विपणनात विख्यात होते. या दोघांमध्ये फारसे साधर्म्य नसल्याचे त्यांनी म्हटले. गेट्स म्हणाले की, ऍलन मस्क यांचे काम चांगले आहे, यामध्ये वाद नाही. मात्र, त्यांनी विकसित केलेले इलेक्ट्रिक वाहनातील तंत्रज्ञान पर्यावरण संतुलनासाठी विकसित झालेल्या इतर तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी सोपे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये टेस्ला कंपनीचे शेअर वाढले आहेत, ही वाढ योग्य आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, ते ठरविण्याचा अधिकार गुंतवणूकदारांचा आहे. त्यावर मी भाष्य करणे बरोबर होणार नाही.
मस्क यांनीही गेट्सना कमी लेखले
बिल गेट्स व ऍलन मस्क यांच्यादरम्यान जाहीर खटके गेल्या सहा महिन्यांपासून उडत आहेत. गेट्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा आपल्यावर फारसा प्रभाव पडणार नाही, असे ट्विट ऍलन मस्क यांनी केले होते. तर ऍलन मस्क वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला प्रकाशझोतात ठेवतात, असे बिल गेट्स म्हणाले होते.