धक्कादायक; पुणे- 4, राज्य-36, देशात 382 डॉक्टरांचा करोनाने मृत्यू

पुणे – करोना बाधितांना उपचार देताना महाराष्ट्रातील 36 करोनायोद्धा डॉक्टरांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. यात पुण्यातील चार, तर देशात आतापर्यंत 382 डॉक्टरांना करोना संसर्ग झाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले. बाधितांमध्ये सर्वाधिक जनरल प्रॅक्टिशनर्सचा समावेश आहे, अशी माहिती पुढे आल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सांगितले.

 

करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य, केंद्र सरकार प्रयत्नशील आहेत. पण, तरीही संसर्ग कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यात करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही बाधा होत असल्याने चिंता वाढली आहे. यात पुण्यासह मुंबई, भिंवडी, कल्याण, अकोला, रत्नागिरी, धुळे या ठिकाणच्या डॉक्टरांचा मृत्यूमध्ये समावेश आहे.

 

त्यामध्ये पुण्यातील डॉ. विकास आबनावे, डॉ. श्रीधर जगताप, डॉ. संजय शेलार आणि सासवड येथील डॉ. भारत तांबे यांचा समावेश आहे. हे डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर, फॅमिली फिजिशियन होते. मृत पावलेल्या डॉक्टरांची यादीच इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तयार केली आहे, अशी माहिती संघटनेच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

करोनाने मृत्यू झालेल्या डॉक्टरांची राज्यनिहाय संख्या

तामिळनाडू- 62, आंध्रप्रदेश-42, कर्नाटक-41, गुजरात-36, पश्चिम बंगाल- 27 सोबतच दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, ओडिसा, पंजाबसह अन्य राज्यांमधून 174 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची नोंद आयएमएने केली आहे.

 

अन्य देशांच्या तुलनेत करोनामुळे मृत्यू झालेल्या भारतातील डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. डॉक्टरांना एकीकडे करोनायोद्धा म्हणून म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांची नोंद न ठेवणे हे चुकीचे आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांना सरकारने शहिदाचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ द्यावा.

– डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.