पुणे – महापालिका मुख्यसभा सोमवारी पुन्हा गोंधळातच तहकूब झाली. यावेळीही “सभा चालवा’ अशी मागणी विरोधकांनी केली; तर याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “तु तु- मैं-मैं’ झाली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी “नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत मुख्यसभेत आंदोलन केले.
“सभा चालवण्यासाठी राज्य सरकारची परवानगी नाही, त्यामुळे सभा तहकूब करावी,’ अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी लावून धरली, तर “पुणेकरांच्या प्रश्नांवर प्रशासनाने खुलासा करावा,’ अशीही मागणी करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या सभा तहकूब केल्या जात आहेत. राज्य सरकारने पालिकेच्या सभा ऑनलाइन पद्धतीने चालवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवारच्या सभेस सभागृहामध्ये पदाधिकारी आणि काही नगरसेवक प्रत्यक्ष तर काही ऑनलाइन उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शहरातील पावसाळी कामे, रस्त्यावर साचणारे पाणी यासंदर्भात प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. अन्य सभासदांनीही करोनाविषयावर प्रश्न उपस्थित केले.
राज्य सरकारने सभा चालवण्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे सभा तहकुब करण्याची मागणी करत सभागृहनेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली. त्यांच्या तहकुबीला श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, दीपक पोटे यांनी पाठबळ दिले. या तहकुबीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार अक्षेप घेत महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप यावेळी सत्ताधाऱ्यांनी केला.
पावसाळी कामांसंदर्भात विविध विभागांनी उपाययोजना केल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केला. मात्र, “मोघम खुलासा करू नका, सविस्तर माहिती द्या,’ अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. तर कल्व्हर्ट निविदेतील भ्रष्टाचाराची माहिती द्या, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक संगनमत करून गोंधळ करत असल्याचा आरोप मनसे गटनेते वसंत मोरे यांनी केला. या गोंधळातच सभागृह नेत्यांनी सभा तहकुबी मांडली आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सभा तहकूब केली.
शहरात पाऊस सुरू असताना, नदी, नाले ओढ्यांमधून पाणी वाहत आहेत. मध्य शहरात पिण्याचे पाणी चोवीस तास सुरू असताना, हडपसरकरांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आम्ही कायम पावसाचे साचलेले पाणी प्यायचे का? महापालिका हडपसरवासियांना सावत्रपणाची वागणूक का देत आहे?
– योगेश ससाणे, नगरसेवक.