मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नॉकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी आणखी सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
करमजीतसिंग आनंद, ड्वेन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. या सर्वांची नावे चौकशीत समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद हा औषधांचा पुरवठा करणारा व्यावसायीक आहे. त्याचे चित्रपट उद्योगात कनेक्शन आहे. तर फर्नांडिस हा गांजाची तस्करी करीत असे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा साथीदार आहे. ज्याला या प्रकरणात फेडरल ऍन्टी ड्रग्स एजन्सीने अटक केली होती. फर्नांडिसनेच औषधांचा पुरवठा केला असल्याचा एनसीबीला संशय आहे.
दरम्यान, एनसीबीचे विशेष तपास पथक (एसआयटी) ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, शोविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि इतरांना अटक करण्यात आली आहे.