पुणे – बिल कमी करण्याच्या महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवल खासगी हॉस्पिटलने रुग्णाकडून पूर्ण बिल घेतल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. एवढेच नव्हे, तर “जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे उपचाराविना मृत्यु होत आहेत. आम्ही तर तुम्हांला बेड उपलब्ध करून दिला,’ अशी भाषा करत “पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडणारच नाही’ असा पवित्रा खासगी हॉस्पिटलने घेतला आणि आम्ही महापालिकेच्या नियंत्रणात येत नाही असे उत्तरही संबंधित रुग्णाला दिले. “युनिव्हर्सल हॉस्पिटल’ असे या रुग्णालयाचे नाव असून, ते शनिवारवाड्याजवळ आहे.
करोना पॉझिटिव्ह रुग्ण करोनामुक्त झाल्यावर त्याला घरी घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी बिलाची रक्कम भरली; परंतु ती कमी करण्याचे पत्र देऊनही कमी न केल्याने अशा हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
एक 54 वर्षीय पुरूष रुग्ण या हॉस्पिटलमध्ये 3 सप्टेंबर रोजी करोनावर उपचार घेण्यासाठी दाखल झाला. सर्व औषधे हॉस्पिटलने बाहेरून आणण्यास लावली. सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीचे औषधे रुग्णाच्या नातेवाईकांनी आणूनही दिली; परंतु डिस्चार्जच्या दिवशी 1 लाख 14 हजार 100 रूपयांचे बिल रुग्णाच्या नातेवाईकाच्या हातात दिले गेले. अव्वाच्या सव्वा बिल झाल्याने त्यांनी महापालिकेकडे त्याची तक्रार केली.
या अर्जानुसार महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक आणि त्यांच्या टीमने या बिलातील जास्तीचे लावलेले 49 हजार 300 रूपये कमी केले आणि संबंधित रुग्णाकडून 64 हजार 800 रुपये घेण्याबाबत महापालिकेच्या सही शिक्क्याचे पत्र हॉस्पिटल प्रशासनाला दिले. ते घेऊन नातेवाईक हॉस्पिटलमध्ये गेले असता, त्यांनी बिल कमी करण्याला नकार दिला. शिवाय महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. नाईक यांचा कॉलही हॉस्पिटलच्या प्रमुखांनी उचलला नाही. दरम्यान, संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.