पुण्यातील ‘या प्रकरणावरून’ अजितदादा संतापले

जम्बो कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी आल्यास कारवाई : अधिकाऱ्यांना "दम'

पुणे – जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी तेथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असावे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. बेड्स उपलब्धतेची माहिती पोहचवण्यात व उपचारांत हलगर्जीपणा झाल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी करोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, “पुण्यातील रुग्णालयांत राज्यभरातून करोना बाधित उपचारासाठी येत आहेत. त्यांना वेळेत व योग्य ते उपचार देण्यासाठी यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाने सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्येदेखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी कार्यवाही करावी.’

ऑक्सिजन टॅंकरला सायरन

ऑक्सिजनअभावी कोणत्याही रुग्णाला जीव गमवावा लागू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टॅंकर वाहतुकीदरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी टॅंकरला ऍम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करावी. ऑक्सिजन टॅंकर मार्गस्थ होण्यासाठी पोलिसांनीही प्रयत्न करावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

करोना साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. करोना रोखण्यासाठी 15 सप्टेंबरपासून राज्यभर “माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. याला नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.