10 सप्टेंबरपर्यंतच मिळणार 16 पासकेंद्रांवर सुविधा
पिंपरी – लॉकडाऊनमुळे पीएमपी वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना काढलेल्या पासचा वापर करता आला नसल्याने उर्वरित मुदत वाढवून देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 16 पासकेंद्रांवर पासची मुदत वाढवून देण्यात येत असून 3 ते 10 सप्टेंबर या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे 23 मार्च पासून पीएमपी बसेसचे संचलन बंद करण्यात आले. याकारणाने प्रवासी पासधारकांना आपल्या पासचा वापरच करता आला नाही. यामुळे वापरात न आलेल्या पासला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. याचीच दखल घेत 3 सप्टेंबरपासून पासधारकांना मुदतवाढ द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 16 पासकेंद्रावर पासची मुदतवाढ करून देण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात स्वारगेट, महात्मा गांधी, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणे स्टेशन, विश्रांतवाडी, वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चौक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) व सांगवी पासकेंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ करून मिळणार आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या मुदतीतच आपल्या पासची मुदतवाढ वाढवून घ्यावी व पासकेंद्रावर सोशल-डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क परिधान करावे असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.