पुणे – टिळक रस्त्यावर एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश अरुण नांगरे(43, रा.धायरी, सिंहगड रस्ता) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद सुरेश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.
प्रसाद हे उमेश यांचे मित्र आहेत. उमेश एका बॅंकेत वसुली अधिकारी म्हणूक काम करतात. ते रात्री साडेदहाच्या सुमारास महाराष्ट्र मंडळाच्या पदपथावरुन चालले होते. यावेळी अचानक तीन व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी उमेश यांच्या डोक्याव, हातावर आणि पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपी तेथून पळून गेले.
घटनास्थळी तातडीने पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळकसर, उपनिरीक्षक व्ही.एम.देशमुख यांनी भेट दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही घटना वैयक्तीक वादातून घडली असल्याचे निष्पन्न झाले आहे.