बारामती (प्रतिनिधी)- बारामती उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागत आहे. बारामतीत 196 सदनिकांचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न निकाली निघताच शहर व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी बारामतीत रो-हाऊसच्या धर्तीवर निवासस्थाने उभी केली जाणार आहेत. परंतु सध्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहिते म्हणाले, बारामतीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशेजारी सध्या पोलीस लाईन आहे. या ठिकाणची निवासस्थाने जुन्या पद्धतीची आहेत. शिवाय कमी प्रमाणात निवासस्थानांची व्यवस्था उपलब्ध होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी 4 इमारतीत 196 सदनिका उभ्या केल्या जाणार आहेत. दोन बेडरुम, एक किचन, हॉल व शौचालय, स्नानगृहासह 501 स्क्वेअर फुटांची एक सदनिका असेल. सात मजली इमारत येथे उभी राहणार आहे.
या कामासाठी पोलीस लाईनमध्ये सध्या राहत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर भाडेकरू म्हणून काही दिवस राहावे लागणार आहे. या कालावधीतील भाडे त्यांना दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण विभागाकडून हे काम केले जाणार आहे.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेसाठी येथील प्रशासकीय भवनासमोरील कवि मोरोपंत नाट्यगृहाशेजारील जागा निश्चित करण्यात आली आहे. साडेतीन एकर जागेवर ही तिन्ही कार्यालये होणार आहे. सुमारे 15 कोटी रुपयांचे हे काम प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय वालचंदनगर पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र दिमाखदार इमारत उभी राहणार आहे. दोन्ही कामांसाठी 45 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते.
वालचंदनगरला नवीन इमारत प्रस्तावित
वालचंदनगर पोलीस ठाण्यासाठी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. सध्या पोलीस ठाणे कार्यरत असलेली इमारत जुनी आहे. त्या पाठीमागे शेती महामंडळाची पाच एकर जागा घेण्यात आली आहे. तेथे पोलीस ठाण्यासह अधिकाऱ्यांसाठी चार निवासस्थाने तसेच परेड ग्राऊंडची व्यवस्था केली जाणार आहे. बगीचा तसेच ओपन जीम या ठिकाणी असेल. या दोन्ही कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.