पुणे – राज्य शासनाने घेतलेल्या मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली. यामुळे सदनिका, दुकान अथवा जमीन खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात खरेदी-विक्रीचे 4 हजार 739 दस्त नोंदविले गेले असून त्यातून राज्य शासनाला सुमारे 36 कोटींचा महसूल मिळाला.
डिसेंबर 2020 अखेरपर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के, तर दि. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 2 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सदनिकांचे दरदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनादेखील दिलासा मिळत आहे. दि.1 सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाला दिल्या. मात्र, 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीची शासकीय सुट्टी असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून झाली.
राज्यात बुधवारी सर्व प्रकारचे दस्त मिळून एकूण 7 हजार 327 दस्त नोंदवले गेले. यातून 46 कोटी 31 लाख रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये जमीन, सदनिका आणि दुकाने या प्रकारचे 4 हजार 739 दस्त नोंदवले.