पुणे – पुण्यातील अनंत चतुर्दशीला अनेक तास चालणारी मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी उत्सव मंडप किंवा मंडपातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मंगळवारी विसर्जन होणार आहे.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकांमध्ये नागरिक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. परंतु यावर्षी केवळ मंडळाच्या कमीतकमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन होणार असून, नागरिकांना हा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे.
दरवर्षी सजावलेल्या रथातून ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघतात. मात्र, मंगळवारी महापौर सकाळी 10.30 वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील आणि त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे. यासह श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 12.15 वाजता, श्री गुरुजी तालीमच्या गणपतीचे विसर्जन दुपारी 1 वाजता, श्री तुळशीबाग गणपतीचे विसर्जन दुपारी 1.45 वाजता, केसरी वाडा गणपतीचे विसर्जन दुपारी 2.30 वाजता विसर्जन होणार आहे.
सोबतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीचे विसर्जन दुपारी 3.15 वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे विसर्जन सायंकाळी 7 वाजता होणार आहे, अशी माहिती मंडळांच्या वतीने देण्यात आली.