शिक्रापूर (पुणे) – येथील परिसरात वाढता करोनाचा धोका लक्षात घेता विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांकडून शिक्रापूर पोलिसांनी दोन दिवसात 504 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 26 हजार पाचशे रुपये दंड वसूल केला.
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, सणसवाडीसह इतर गावांमध्ये वाड्या वस्त्या, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे करोना बाधित रुग्ण आढळून येत असतात. दोन दिवसांत 77 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शिक्रापूर पोलिसांनी गांभीर्याने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी विनामास्क फिरणा-या व सोशल डिस्टन्स न पाळणा-या नागरिक व दुकांनावर कारवाई सुुरु केली आहे.
शनिवारी (दि. 29) शिक्रापूर येथील चाकण चौक येथे 67 जणांवर कारवाई करीत 13 हजार चारशे रुपये दंड, पाबळ चौक 18 जणांवर कारवाई करीत 11 हजार पाचशे रुपये, सणसवाडी 132 जणांवर कारवाई करीत 36 हजार रुपये, कोरेगाव भीमा येथे 75 जणांवर कारवाई करीत 16 हजार 200 रुपये, पाबळ येथे 99 जणांवर कारवाई करीत 25 हजार दोनशे रुपये, तळेगाव ढमढेरे येथे 91 जणांवर कारवाई करीत 18 हजार दोनशे रुपये, मलठण फाटा येथे 8 जणांवर कारवाई करीत चार हजार रुपये अशी एकूण 1 लाख 26 हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
- विना मास्क कारवाई सुरूच राहणार
शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या गावांमध्ये लोकांनी विना मास्क घराबाहेर कोणीही पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. जनमानसात करोनाचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी शिक्रापुर पोलीस ठाण्यांतर्गत विना मास्क फिरणाऱ्यांवर व सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.