पिंपरी – सेलिब्रिटींनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. शाडू मातीची गणेशमूर्ती बनवुन पाच, सात आणि दहा दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. शुटींगमधून वेळ काढून सेलिब्रिटींनी गणरायाचे आवर्जून स्वागत केले. गणेश मूर्ती विसर्जन देखील घरातच किंवा फिरत्या हौदात करण्यात आले.
स्वतः बनविली मूर्ती – सोनाली कुलकर्णी
पारंपारिक गणेशोत्सव साजरा करण्याची आमच्याकडे आजोबांपासून परंपरा आहे. निगडी-प्राधिकरण येथील घरी आम्ही गणरायाची प्रतिष्ठापना करतो. आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो. यंदा मी व माझ्या भावाने मिळून शाडू मातीची मूर्ती बनविली आहे. त्यासाठी साध्या पद्धतीची “इको-फ्रेंडली’ आरास केली. मी यंदा लॉकडाऊनमध्ये पूर्ण स्वयंपाक शिकले. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या पद्धतीचे मोदकही बनविले. गणरायाचे आम्ही घरातच केमिकलविरहित विसर्जन करणार आहे.
पर्यावरणपूरक सजावट – सायली सांभारे-राजहंस
आमच्याकडे सांगलीला बऱ्याच वर्षांपासून गणपती बसविला जातो. “सांभारे गणपती’ म्हणून तो परिचित आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी चिंचवडच्या घरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करीत आहे. आमच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. आम्ही शाडू मातीची गणेशमूर्ती बसविली होती. गणरायाला पर्यावरणपूरक सजावट केली होती. फर्निचरचे तुकडे, प्लायवूड यांच्यापासून गणरायासाठी आसन बनविले होते. प्रसादासाठी खास उकडीचे मोदक बनविले. गौरी पूजन देखील केले. शूटींगमधून खास वेळ काढून मी गणेशोत्सवासाठी घरी आले होते. फिरत्या वाहनांद्वारे गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेत आम्ही गणेश मूर्ती विसर्जन केले.
केमिकलविरहित विसर्जन – स्मिता तांबे
दरवर्षी आमच्याकडे घरी गणपती बसविला जातो. त्याचबरोबर गौरी पूजनही होते. माझे पती स्वत:च शाडू मातीची मूर्ती बनवितात. त्याच गणेशमूर्तीची आम्ही प्रतिष्ठापना करतो. मी मूळ पिंपरी-चिंचवडची. यंदा आम्ही मुंबईतल्या घरी गणपती बसविला होता. गणरायाच्या आसनामागे श्री शंकराचे बनविलेले पेटींग ठेवले होते. गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रावर न करता आम्ही घरीच करतो. यंदा देखील घरीच केमिकलविरहित विसर्जन केले.
‘इको-फ्रेंडली’ उत्सव – डॉ. संजीवकुमार पाटील
गणेशोत्सवासाठी गणरायाची शाडू मातीतील मूर्ती मुलांच्या मदतीने घरी बनविली. त्यासाठी कापड, पडदे, विद्युतमाळा यांची आकर्षक सजावट केली. निगडी-प्राधिकरण येथील घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली. गेल्या वीस वर्षांपासून आमच्या घरी गणेशोत्सव केला जात आहे. आम्ही पर्यावरणप्रेमी असल्याने पर्यावरणपूरकच सजावट करतो. तसेच, शाडू मातीचीच मूर्ती आम्ही वापरतो.