नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे राजीनामा देणार आहेत. जपानमधील राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. मागील बऱ्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे. आजच यासंदर्भातील निर्णय होणार असून संध्याकाळपर्यंत आबे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा करतील असं सांगितलं जात आहे. आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र आहेत. आबे आणि मोदींच्या काळामध्ये भारत आणि जपानमधील संबंध अधिक सदृढ झाल्याचे राजकीय विषयातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच आता आबेंच्या जागी कोण येणार याकडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
आबे यांची प्रकृती ठीक असल्याने जपानमधील सत्ताधारी पक्षाने म्हटले होते. मात्र सलग दोन वेळा आबे यांना रुग्णालयात जावे लागल्याने त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील शंका उपस्थित केल्या जात होत्या. नुकतेच ते रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेले होते तेव्हा आठ तास लागले होते. त्यावरुन प्रकरण काहीतरी गंभीर असल्याच्या चर्चा जपानमध्ये सुरु होत्या. आबे यांची पंतप्रधान पदाची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. सोमवारीच त्यांनी सर्वाधिक काळ जपानच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्यांनी त्यांचेच काका इसाकू सातो यांचा विक्रम मोडल्याचे वृत्त एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्राने दिले होते.