करोना क्‍वॉरंटाइन सेंटरच्या सुरक्षेसाठी तीन कोटींचा खर्च

पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून क्‍वॉरंटाइन सेंटरच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मार्च ते ऑगस्ट या कालावधीत 220 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पाच महिन्यांत त्यांच्या मानधनावर तीन कोटी रूपये खर्च झाले आहेत.

शहरातील करोना बाधितांचा आकडा 45 हजारापार गेला आहे. दररोज करोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध करोना वॉर्ड आणि करोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे करोना रूग्णांवरील उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे. नवीन भोसरी आणि नवीन जिजामाता ही रूग्णालये करोना हेल्थ सेंटर म्हणून समर्पित करण्यात आली आहेत.

आकुर्डीतील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हॉस्टेल, शाहूनगर येथील रिजनल टेलीकॉम सेंटर, किवळे येथील सिम्बॉयसिस कॉलेज हॉस्टेल, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे हॉस्टेल, मोशीतील आदिवासी विभाग मुलांचे आणि मुलींचे हॉस्टेल, संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदीक कॉलेज हॉस्टेल, बालाजी युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज, इंदीरा कॉलेज हॉस्टेल, युनिव्हर्सल कॅम्पस, बालेवाडी हॉस्टेल, मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे मुले आणि मुलींचे वसतीगृह, चाकण-म्हाळुंगे येथील म्हाडा वसाहत आदी ठिकाणी करोना केअर सेंटर उभारण्यात आली आहेत.

मार्च महिन्यात शहरात पर्यटन अथवा कामानिमित्त परदेशी जाऊन आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्‍वॉरंटाइन ठेवण्यात येत होते. त्यामुळे महापालिकेमार्फत सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत होती. त्या अनुषंगाने जिल्हा समादेशक होमगार्ड, पुणे जिल्हा कार्यालयामार्फत 23 मार्चपासून 22 ऑगस्ट या कालावधीपर्यंत 220 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

त्यांना प्रति दिन प्रति होमगार्ड 988 रूपये 25 पैसे याप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत या होमगार्डच्या वेतनापोटी 3 कोटी 11 लाख 75 हजार रूपये खर्च होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येईपर्यंत क्‍वॉरंटाइन कामकाजासाठी होमगार्ड कायम ठेवण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.