पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेसाठी डॉक्टरांच्या भरतीवरून माजी महापौर योगेश बहल यांनी केलेले बेछूट आरोप हे त्यांनी त्यांची दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने केले आहेत. तसेच त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांचा अवमान केला असून महापालिकेतील वरिष्ठ पदे भूषविणाऱ्या व्यक्तीकडून असे आरोप योग्य नसल्याचा पलटवार सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.
बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी पदव्युत्तर शिक्षण संस्थेसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या नियमितीकरणास विरोध केला होता. सर्वसाधारण सभेत विरोध करताना त्यांनी डॉक्टर भरती प्रक्रियेत प्रत्येक डॉक्टरकडून भाजपाच्या नेत्यांनी पन्नास लाख रुपये घेतले असून त्याच दबावातून त्यांनी विषय घाई घाईत मंजूर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपाच्या नगरसेवकांना “अफजलखानाच्या पिलावळी’ अशी उपमा दिली होती.
या आरोपांना आज (गुरुवारी) पक्षनेते नामदेव ढाके यांनी उत्तर देत योगेश बहल यांची दुकानदारीच समोर आणली. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करोना काळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्य शासनाचे निर्देश लक्षात घेऊन हा विषय सभेत मांडण्यात आला होता. या विषयावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी महापौर व विरोधी पक्षनेते पद भूषविलेले योगेश बहल यांनी डॉक्टरांच्या करोना काळातील उत्कृष्ठ कामगिरीवर ठपका ठेवत डॉक्टर भरतीत लाखो रुपयांची देवाण घेवाण झाल्याचे बेछूट आरोप करत डॉक्टरांच्या अस्मितेवर गदा आणून अवमान केला आहे.
वास्तविक डॉक्टर भरतीची गरज विचारात घेवून विषय मंजूर करण्यावर सर्वांचे एकमत होते. मात्र स्वत:ची दुकानदारी बंद होणार म्हणून बहल यांना पोटसूळ उठला व त्यांनी त्या भीतीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण न ठेवता थेट आरोप केले.
कुठल्याही विषयाची योग्य माहिती न घेता बोलायचे म्हणून बोलावे हे महापौर व विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या बहल यांना न शोभणारे आहे. भाजपाला हे श्रेय जाईल या हेतुनेच बहल हे डॉक्टरांवर व भाजपावर बेछूट आरोप बदनाम करण्याचा खटाटोप करत असून शहराचे दुर्देव असल्याचेही ढाके यांनी म्हटले आहे.