मनिला (फिलीपाईन्स) – दक्षिण फिलीपाईन्समधील सुलू प्रांतातल्या जोलो शहरामध्ये इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी घडवलेल्या एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून किमान 10 ठार झाले.
इस्लामिक स्टेटच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता फिलीपाईन्समध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही हा बॉम्बस्फोट झाला, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बॉम्बस्फोटात 5 सैनिक आणि 4 नागरिक ठार झाले. सैन्याच्या दोन ट्रकमध्ये पार्क केलेल्या एका मोटरसायकलवर हा बॉम्ब बसवण्यात आला होता.
त्यानंतर तासाभरातच एका आत्मघातकी दहशतवादी महिलेने एक बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यामध्ये या महिलेसह एक सैनिक ठार झाला, असे प्रादेशिक लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल कॉर्लेटो विलुलुआन यांनी सांगितले. हा सैनिक काही जणांची तपासणी करत असतानाच हा स्फोट झाला.
याच भागातील एका मोठ्या बाजारपेठेमध्ये तिसरा बॉम्बस्फोटही झाला असल्याचे समजते आहे. त्यानंतर जोलो शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 40 सैनिक, पोलीस आणि नगरिकही जखमी झाले आहेत.