बोधेगावात हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
बोधेगाव (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे बाबाभाई पठाण यानी हिंदू बहिणीने बांधलेल्या राखीची परतफेड म्हणून आपल्या भाच्यासमान असलेल्या दोन मुलींचा लहानपणापासूनचा खर्च करत आता विवाहाची जबाबदारीदेखील पार पाडल्याने त्यांचे तालुक्यामधून कौतुक केले जात आहे.
हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या बोधेगाव येथील श्री साध्वी बन्नोमा देवस्थानची यात्रा हिंदू- मुस्लिम एकत्र येवून मोठ्या गुण्यागोविंदाने पार पाडतात. दरम्यान या देवस्थानची प्रेरणा तसेच सामाजिक कार्याची आवड आसलेल्या बाबाभाई पठाण यांनी आपल्याला बांधत आसलेल्या भुसारी ताईच्या राखीचा मान तसेच त्यांच्या घरची बेताची असलेली परिस्थिती बाबाभाई यांना माहित होती. त्यामुळे त्यांनी त्या दोन मुलींचा लहानपणापासून सांभाळ केला.
त्यांना लागणारा शैक्षणिक, तसेच आर्थिक खर्चाचा भार उचलत नेहमी मदत केली.
मुलींचे कन्यादान झाल्याशिवाय मामाचे कर्तव्य पूर्ण होत नसल्याने त्यांनी या दोन मुलींचा विवाह जवळच असलेल्या मुंगी गावात एकाचा स्टेशनरी तर दुसऱ्याचा हॉटेल व्यवसाय असलेल्या मुलासोबत लावून दिला. यावेळी बाबाभाई यांनी या मुलींच्या पाठीमागे उभा राहात मामाचे तर लग्नाचे विधी पार पाडत पालकाचे कर्तव्य बजावले. ी बाबाभाईंनी भावाचे कर्तव्य पार पाडल्याने बोधेगावातील हिंदू-मुस्लिम समाजाची एकता पुन्हा जगासमोर दाखवून दिली आहे.