प्रवीण राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पाथर्डी (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळावी, अशी मागणी करणारे शेकडो पोस्टकार्ड नगरपरिषदेचे आरोग्य सभापती प्रविण राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहेत.
पाथर्डीच्या टपाल पेटीत शेकडो पोस्टकार्ड टाकल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रवीण राजगुरू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची भूमिका घेऊन भाजपने मुख्यमंत्र्यांना मागणी पत्र पाठवून जागे करण्यासाठी अनोख्या आंदोलनाची भूमिका घेतली. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यातही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले. परंतु आघाडी सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही.
दूध दरवाढीसाठी भाजपच्या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असून यामध्ये पत्र (पोस्ट कार्ड), ई-मेल, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादी माध्यमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जागे करण्याची भूमिका घेतली आहे. पाथर्डी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी दूध दरवाढ व दुधाच्या बुक तिला अनुदान या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना हजारो पत्र पाठवून आंदोलनात सहभाग घेतला आहे. आघाडी सरकारने दूध दरवाढीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी राजगुरू यांनी केली.
यावेळी संजय आव्हाड, अशोक सातपुते, महादेव सानप, किशन हातागले, सोपान काळोखे, गणेश पडवळकर, तुषार घोरपडे, ऋषिकेश मोहिते, प्रविण ढाकणे, महादेव गायके, कृष्णा मिसाळ आदी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्या.