पुणे (प्रभात वृत्तसेवा) – शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करुण देण्याची मागणी केल्याप्रकरणात अमोल सतिश चव्हाण (कोथरुड) याला पोलिसांनी अटक केली. त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात एका महिलेसह बडतर्फ पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ), स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा.प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, तिघांनी जामिनही मिळविला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
याबाबत सुधीर वसंत कर्नाटकी (64,रा.राजगड, पौड) यांनी कोथरूड पोलिसात फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर 2019 ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. यामध्ये चव्हाण याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करायची आहे. घरझडती दरम्यान त्याच्या घरातून वेगवेगळ्या मालमत्तेची कागदपत्रे मिळाली असून त्याने कोणाच्या सांगण्यावरून फिर्यादी यांना धमकी दिली. यासह विविध अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पोलीस कोठडीस विरोध केला.