नवी दिल्ली – हवाई दल प्रमुख आरकेएस् भदौरिया यांनी आज हवाई दलाच्या पश्चिम विभागातील हवाई तळावर मिग 21 मधून उड्डाण केले आणि हवाई दलाच्या सज्जतेचा सर्वसमावेशक आढावा घेतला. पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यंपासून असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर हवाई दलाने पश्चिम विभागांतर्गत आपल्या बहुतेक तळांवर उच्च श्रेणीची तयारी राखली आहे.
लडाख भागातील अतिशय संवेदनशील भागांना तसेच उत्तर भारतातील विविध ठिकाणांना हवाई संरक्षण देण्याकडे हवाई दलाच्या पश्चिम विभागाच्यावतीने लक्ष दिले जाते. हवाई दलप्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून या हवाई तळांवरील तयारीचा आढावा घेतला.
हवाई दल प्रमुखांनी मिग-21 बिसन विमानातून हवाई उड्डाणही केले. मिग-21 बिसन हे मूळ रशियन बनावटीचे एकच इंजिन आणि एकच सीट असलेले बहुउपयोगी लढाऊ विमान आहे. हे विमान गेल्या काही दशकांपासून हवाई दलाचा कणा मानले जाते. 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये मिग-21 विमानांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.
गेल्या आठवड्यात हवाई दलाचे उपप्रमुख हरजीत सिंग अरोरा यांनी पूर्व लडाखमधील ताबा रेषेजवळच्या विविध हवाई तळांना भेट दिली होती आणि हवाई दलाच्या कृतीशील तयारीचा आढावा घेतला होता. एअर मार्शल सिंग यांनी जगतील सर्वात उंचीवरचा हवाई तळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या दौलत बेग ओल्डी येथील तळालाही भेट दिली होती. हा हवाई तळ समुद्रसपाटीपासून 16,600 फूट उंचीवर आहे.
जून महिन्यात एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी लडाख आणि श्रीनगर येथील तळांनाही गुपचूप भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला होता.
गेल्या दोन महिन्यात हवाई दलान सुखोई-30, जॅग्वॉर आणि मिराज् 2000 या बहुतेक सर्व फ्रंटलाईन फायटर जेटना पूर्व लडख आणि ताबा रेषेच्या जवळपास तैनात केले आहे. हवाई दलाने अपाचे लढऊ हेलिकॉप्टर आणि लष्करी जवानांच्या वाहतुकीसाठी चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरही पूर्व लडाखजवळच्या वेगवेगळ्या ठिकाणी तयार ठेवली आहेत. पूर्व लडाख भागात रात्रीच्यावेळेस हवाई गस्तही घातली जात आहे.