न्यूयॉर्क – जागतिक टेनिसमध्ये महिलांच्या खेळाचे आयाम निर्माण करणारी अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने सहा महिन्यांनंतर सरावाला सुरुवात केली आहे. अमेरिकन ओपन टेनिससह जगभरात आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांसाठी सज्ज होत असल्याचेही तिने व्यक्त केले.
पुढील आठवड्यात होत असलेल्या टॉपसीड ओपन टेनिस स्पर्धेद्वारे ती इतक्या दिवसांच्या खंडांनंतर प्रथमच स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी होत आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेपूर्वी सरावासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यात सरस खेळ करण्यासाठीच सरावात मेहनत घेत असल्याचे सेरेनाने सांगितले.
करोनामुळे सर्व स्पर्धा व सराव ठप्प झाला होता. याकाळात माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच माझी मानसिक स्थिती उत्तम राहिली त्यामुळेच येत्या काळातील स्पर्धांमध्ये पूर्ण सकारात्मकतेने सहभागी होणार असल्याचेही सेरेनाने म्हटले आहे.