पंचवटी, पाषाण ते सेनापती बापट रोड आणि पौड रोडवरील प्रकल्प
पुणे – पंचवटी, पाषाण ते सेनापती बापट रस्ता तसेच पौड रस्ता भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी “आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट एस्टॅब्लिशमेंट’ (एआरडीई) विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. ही परवानगी मिळत नसल्याने या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षणही रखडले होते.
शहरातील वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेता हा भुयारी मार्ग गतीने होण्यासाठी त्याचे सर्वेक्षण गरजेचे होते. यासाठी संरक्षण खात्याअंतर्गत असलेल्या “एआरडीई’ची मंजुरी आवश्यक होती. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मागील आठवड्यात बैठक घेऊन या सर्वेक्षणाला मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्याला त्यांनी अटी शर्तींसह मंजुरी मिळाली आहे. यामुळे भुयारी मार्गाच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, “आता हे सर्वेक्षण गतीने सुरुवात करा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले आहेत.
…म्हणून सर्वेक्षण महत्त्वाचे
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव पडून आहे. यासाठी सल्लागार कंपनीही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, याचा डीपीआर तयार करण्यासाठी जे सर्वेक्षण करणे आवश्यक होते, त्याला अनेक संस्थांची परवानगी आवश्यक होती. त्यामध्ये “दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय), “नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ (एनसीएल), वनविभाग आणि “एआरडीई’ यांचा समावेश होता. यातील तिघांनी सन 2018 मध्ये सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. मात्र “एआरडीए’ने ही परवानगी नाकारली होती.
वेळ आणि अंतराचीही बचत
1. कोथरूड ते पाषाण हे अंतर 8.40 किमी आहे. तर भुयारी मार्गामुळे ते 4.11 किमी म्हणजे जवळपास निम्मे होणार असून, वाहतुकीचे 15 ते 25 मिनिटे वाचणार आहेत.
2. पाषाण रस्ता ते गोखलेनगर हे 4.20 किमीचे अंतर या भुयारी मार्गामुळे 2.90 किमी होणार आहे. त्यामुळे येथेही सुमारे 10 ते 15 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचेल.
3. वाहतुकीचे विकेंद्रीकरणही होणार असून, वळसा घालून जाणे वाचणार आहे.