पुणे – आरोपीला न्यायालयातून कारागृहात नेण्याऐवजी त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.
पोलीस शिपाई विजय मांढरे आणि हवालदार सूर्यनारायण नायडू अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संतोष चांदीलकर, राजू पात्रे आणि संतोष जगताप या तिघांनी मोरवाडी पिंपरी येथून पलायन केले होते. मात्र, या बडतर्फ दोघांनी हवालदार संजय चंदनशिव यांच्यामार्फत संगनमताने हे आरोपी जुना कात्रज घाट येथून पळाल्याची फिर्याद दाखल केली होती. ही बातमी त्यावेळी मोठी चर्चेची ठरली होती.
पोलीस पार्टी म्हणून तिघा आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहाच्या स्वाधीन करण्याचा आदेश देण्यात आला होता. तरीही, त्यांनी भोर येथे बिर्याणी हाऊसमध्ये गाडी थांबवली आणि आरोपींना जेवणासह मद्यपान करण्यास मदत केली. जुना कात्रज घाट येथून त्यांना खासगी वाहनाने मोरवाडी पिंपरी येथे जाऊ दिले. तसेच सॅपर्स पोलीस चौकीजवळ त्यांची वाट पाहत थांबले. त्यानंतर ते पळून गेल्याची माहिती असताना, ते जुना कात्रज घाट येथून पळाल्याची खोटी फिर्याद दिली. हे सर्व कृत्य विभागीय चौकशीत निष्पन्न झाले होते.