कराड -कासारशिरंबे, ता. कराड येथी यादव मळ्यातील घराजवळच्या पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज गुरुवारी मध्यरात्री चोरून नेला. याबाबत दिलीप राजाराम यादव यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिलीप यादव यांच्या घराचे बांधकाम सुरू असून घराला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी घरातील सामान ठेवले आहे. घरातील सर्व जण गुरुवारी रात्री झोपले असता, पहाटेच्या सुमारास यादव यांची पत्नी सारिका यांना जाग आली.
त्यावेळी पत्र्याचा शेडचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाटातून 45 हजार रुपयांची, तीन तोळ्यांची सोनसाखळी, 15 हजार रुपयांच्या दोन अंगठ्या, 30 हजार रुपयांची दोन तोळ्यांची साखळी व रोख 40 हजार रुपये, असा एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले.